वार्ताहर / दोडामार्ग:
तळेखोल गावातील खडी क्रशर कायमस्वरुपी बंद होण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर छेडलेल्या उपोषणाला चौदा दिवस पूर्ण झाले.
तळेखोल ग्रामपंचायत क्षेत्रात होणाऱया अमर्याद खडी उत्खनन व खडी वाहतुकीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात आजपर्यंत ग्रामस्थ व
ग्रामपंचायतीमार्फत अनेकदा आवाज उठविण्यात आला. शासनाला अनेक अर्ज-विनंत्या करूनही कोणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायत क्षेत्रातील सीमेलगतचे सर्व खडी क्रशर व काळा दगड उत्खनन खाणी कायमस्वरुपी बंद कराव्यात, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. तसेच जोपर्यंत खडी क्रशर, खाणी बंद होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे ग्रामस्थ महादेव सावंत यांनी सांगितले.









