अ साऊंड माईड इन अ साऊंड बॉडी’ अशी एक म्हण आहे. त्याचा प्रत्यय येतो. प्रत्येक माणसाला आपले काम सुव्यवस्थित व्हावे असे वाटते. केवळ शरीर धडधाकट असायला हवे तसेच मनही निरोगी पाहिजे. या चांगल्या व्यायामाचे धडे सुहास्य परिवाराचे वडगाव शाखेचे अरुण जाधव वडगाव येथे देत आहेत. ही अभिमानाची व स्वागतार्ह गोष्ट आहे.
एक अजोड व्यक्तिमत्व
अरुण जाधव कॅनरा बँकेचे सेवानिवृत्त पदाधिकारी. सामाजिक कार्यातही हिरीरीने भाग घेऊन माणसाने समाजासाठी काही तरी चांगले केले पाहिजे. समाजाचे ऋण फेडले पाहिजे, हा त्यांचा कयास! त्यासाठी 4 एप्रिल 2003 रोजी सुहास्य परिवाराची स्थापना केली. सुरुवातीला स्त्री पुरुष कमी संख्येने उपस्थित राहिले. नंतर व्यायामाचे महत्व लोकांना समजले. त्यांच्या नसानसात शिस्त भिनलेली व संस्कारशील आचरण. स्फटिकासारखे मन, बोलणं सरळ, मितभाषी, परोपकारीवृत्ती, तिला शोभणारे दातृत्व, मध्यम उंची, सडपातळ शरीरयष्टी ते प्रत्येकाची जवळून विचारपूस करतात. मदतीचा हात देतात. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होतात. अडचणीला धावून जातात. कोजागिरीच्या पिठूर चांदण्याप्रमाणे मन! व्यायामावर जेवढी नि÷ा तेवढीच करणाऱयावरही माया! असे त्यांचे विलोभनीय व अजोड व्यक्तीमत्व!
सुहास्य परिवार
सुहास्य परिवार एक आदर्श परिवार असून जाधवांच्या जीवनाचा प्रमुख घटक आहे. दिवसेंदिवस लोकांना व्यायामांचे महत्व पटू लागले. स्त्री पुरुषांचा सहभाग वाढला. तो आज 110 ते 120 पर्यंत पोहोचला आहे. आज वडगाव येथील मैदानावर दररोज सकाळी 6 वाजता व्यायामाची सुरुवात प्रार्थनेने होते. ॐकार व गायत्री मंत्राने सामुदायिकरित्या शेवट होतो. एक गोलाकार रिंगण तयार होते. मग व्यायामाला सुरुवात जवळ-जवळ 30 ते 35 व्यायामाचे प्रकार आहेत. प्रत्येक व्यायाम प्रकार 2 ते 3 मिनिटांचा असतो. प्रत्येक आठ मिनिटानंतर मुक्त हास्य, कारंजी हास्य, गोफण फिरविणे, पतंग उडविणेसारखे हास्य प्रकार घेतात. यामुळे ऊर्जा वाढते. पायांच्या बोटापासून डोकीच्या केसांपर्यंत सर्वांगसुंदर व्यायाम घेतात. 30 ते 60 वयोगटातील स्त्री पुरुषांना फारच उपयुक्त व्यायाम होतो.
सुहास्य परिवाराचे आधारस्तंभ-श्रध्दाबल
जाधव सरांच्या नंतर श्याम कामत व्यायामाचे धडे देतात. हा एक ध्येयवेडा माणूस, विचारवंत व समजूतदार व्यक्ती! मोजकेच बोलणे, मितभाषी, व्यायामाला येणाऱयांची अगदी जवळून विचारपूस करणारे!
परिवाराच्या सहली
सुहास्य परिवाराच्यावतीने जाधव सर 6 ते 7 दिवसांपासून, 2 ते 3 दिवसांची, 1 दिवसाची अशा सहली आयोजित करतात. कणकुंबी, चोर्ला घाट, गणपतीपुळे, हैद्राबाद, कन्याकुमारी, वैष्णोदेवी, पंढरपूर, तुळजापूर, तिरुपती, काशी, सिंधुदुर्ग, गोवा अशा देशी, विदेशी सहली केल्या जातात. नवीन तीर्थस्थळे, निसर्गस्थळ, मंदिर, पाहण्यात जो एक आनंद असतो तो अवर्णनीयच! त्यामुळे मनावरचे ओझे गळून पडते. अहंकार विरुन जातो. आनंद द्विगुणीत होतो व सुख समाधान नांदते.
संस्थापक सदस्य मिरजकर, प्रा. बळीराम कानशिडे, रामचंद्र काटकर, खांडेकर, धोत्रे, शिंदे, काळे, मोदगेकर, इ. सदस्य सुहास्य परिवाराचे आधारस्तंभ आहेत. या सर्वांना सांभाळत जाधव सरांनी सुहास्य परिवार एक आदर्श परिवार तयार केला आहे.








