पळसावडेतील भूमिपुत्रांचा टाटा पॉवरविरोधात हल्लाबोल
सातारा : माण तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून भूमिपुत्रांवर अन्याय केला आहे. स्थानिकांचा पगार वाढवला जात नाही. दिलेले आश्वासन कागदावरच ठेवली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरच घोंगडी आंदोलन करून त्यांना भंडारा भेट देणार होतो, परंतु पोलीस प्रशासनाने विनंती केल्यामुळे हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहे, अशी माहिती आंदोलनकर्ते महेश करचे यांनी दिली.
महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपुत्र आंदोलनाला बसलेले आहेत. करचे म्हणाले, मी हे आंदोलन स्थानिक भूमिपुत्रांसाठी करत आहे. कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिला नाही. करार नियमांचे पालन केलेले नाही. वीज पुरवठा व ग्रामविकासाबाबत जी आश्वासने दिली होती, ती कागदावरच राहिली आहेत.
दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरुपी रोजगार द्यावा, कंपनीने सीएसआर निधीचा वापर पारदर्शक करावा, ग्रामस्थांची फसवणूक टाटा पॉवर कंपनीकडून झाली आहे. त्यामुळ १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान उपोषण केले होते. १८ ऑगस्टला दंडवत आंदोलन केले होते. २१ ऑक्टोबरला काळी दिवाळी आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवला आणि आता घोंगडी आंदोलन करत आहोत.








