मोर्च्यात साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा सहभाग
कोल्हापूर : अर्थव इंटरट्रेड प्रा. लि. अर्थात दौलत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंग खोराटे यांनी कामगारांवर अन्याय करणे सुरु केले आहे. त्यांनी चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे सल्लागार डॉ. उदय नारकर यांना धमकी दिली आहे, याबद्दल खोराटेंवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी इंडिया आघाडीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आणि दौलतच्या कामगार, वाहतूकदारांना न्याय देण्याची मागणी केली.
कामगारांवर अन्याय करणाऱ्या खोराटेंवर कारवाई करा, दादागिरी नही चलेगी आदी घोषणा देत मोर्चा दसरा चौकातून निघाला. व्हिनस कॉर्नरमार्गे बसंत बहार रोडवरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. दौलत साखर कारखान्याचे शेकडो कर्मचारी, महिला, इंडिया आघाडीचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.
डॉ. नारकर यांनी धमकी देणाऱ्या खोराटे यांना शासनाने पाठीशी घालू नये, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. कामगार, वाहतूकदारांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी केली. गेली काही वर्षे अथर्व कंपनीने ३९ वर्षांच्या लीजवर चालवायला घेतलेल्या हलकर्णी येथील दौलत साखर कारखान्याचे प्रशासन आणि शेतकरी, कामगारांच्या दरम्यानचे प्रश्न तीव्र बनले आहेत. कारखाना परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली
आहे. अशी परिस्थिती निर्माण होण्यास संचालक मानसिंग खोराटेसर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप डॉ. नारकर यांनी केला.
शनिवारी ८ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज विभाग प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व संबंधितांच्या संयुक्त बैठकीतील त्यांचे वर्तन सौहार्दपूर्ण चर्चेला पूरक नव्हते. उलट, कामगारांच्या अंगावर धावून जाणे, कामगार नेते, चंदगड साखर कामगार युनियनचे खजिनदार प्रा. आबासाहेब चौगले यांना त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली.
बैठक नियोजनबद्धरित्या उधळून लावली. अशा स्थितीत मानसिंग खोराटेंचा सार्वजनिक जीवनातील वावर कायदा, सुव्यवस्था आणि कामगारांच्या जीविताला धोकादायक ठरू शकतो. तेव्हा त्यांनी केलेल्या बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, प्राचार्य कॉ. ए. बी. पाटील, कॉ. दिलीप पोवार, शिवाजीराव परुळेकर, चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, भरमा कांबळे, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, सदा मलाबादे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, बाबूराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.








