बेंगळूर : राज्यात मतचोरीविरुद्धच्या स्वाक्षरी संकलनाची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी स्वाक्षरी 1,12,41,000 स्वाक्षऱ्या असणारी कागदपत्रे एआयसीसीकडे सोपविली. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेथे शिष्टमंडळाने स्वाक्षऱ्यांच्या प्रती असणारा एक बॉक्स सांकेतिकपणे दिला. त्यानंतर उर्वरित बॉक्स राष्ट्रीय काँग्रेसच्या नूतन इमारतीत पक्षाचे राष्ट्रीय सचिव डिसोझा यांच्याकडे सुपूर्द केले.
राज्यातील राजकीय हेतूंनी तयार केलेल्या 40 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाने मतचोरी प्रकरणाविरुद्ध जागृती अभियान राबविले. यावेळी लोकांकडून स्वाक्षऱ्यांचे संकलन करण्यात आले होते. सुमारे 1 कोटी 12 लाख, 41 हजार जणांच्या स्वाक्षऱ्या जमा करण्यात आल्या आहेत. या स्वाक्षऱ्यांच्या प्रती असणारे बॉक्स घेऊन सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार सर्वाधिक स्वाक्षऱ्या संकलित केलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांसमवेत दिल्लीला गेले होते. या प्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अभिषेक दत्त, केपीसीसीचे कार्याध्यक्ष डॉ. जी. सी. चंद्रशेखर, प्रचार समितीचे अध्यक्ष विनय सोरके आदी उपस्थित होते.
कर्नाटकात सर्वप्रथम मतचोरी उघड!
निवडणुकीत मतचोरी होत असल्याचे सर्वप्रथम कर्नाटकात उघडकीस आणले आहे. आता महाराष्ट्र, हरियाणा, बिहारमध्ये मतचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली मतचोरी प्रकरणाविरुद्ध मतदान हक्क संरक्षणासाठी आंदोलन केले आहे. ‘एका व्यक्तीला एक मत’ यासाठी आम्ही आंदोलन करत आहे.
– डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री









