वृत्तसंस्था / कैरो (इजिप्त)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व पिस्तुल-रायफल नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताचा नेमबाज अनीश भनवालाने रौप्य पदक पटकाविले.
हरियाणाच्या 23 वर्षीय अनीशने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पूर्ण निराशा केली होती. पण त्यानंतर त्याने चांगलाच सराव करुन कैरोतील स्पर्धेत 585 गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात फ्रांसच्या क्लिमेंट बेसग्वेटने 589 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. 2022 साली येथे झालेल्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत अनीश भनवालाने भारताला मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात रौप्य पदक मिळवून दिले होते.
नेमबाजीच्या या क्रीडा प्रकारात सहभागी झालेले भारताचे अन्य नेमबाज आदर्श सिंगने 575 गुणांसह 22 वे तर समीरने 571 गुणांसह 35 वे स्थान मिळविले. सदर स्पर्धेत एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या अर्जुन बबुता आणि इलाव्हेनील वलरिवन यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी 632.3 असे गुण नोंदविले. या क्रीडा प्रकारात भारताची सहभागी झालेली अंतिम जोडी रुद्रांक्ष पाटील आणि श्रेया अगरवाल यांनी 628.8 गुणांसह 21 वे स्थान मिळविले.









