थिरुवनंतपुरम :
केरळ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबरला घेण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 13 डिसेंबरला मतगणना केली जाणार आहे. या निवडणुकांसाठी सोमवारपासूनच आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या साहाय्यानेच होणार आहेत. राज्यभरात 33 हजार 746 मतदानकेंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. ग्राम पंचायत, ब्लॉक पंचायत, जिल्हा पंचायत, नगर पंचायत आणि महानगर पालिका यांच्या एकंदर 23 हजार 576 प्रभागांमध्ये या निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली असून सर्व व्यवस्था चोख करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिला गेला आहे.









