कोणीही मृत झाल्यानंतर त्याच्या शरीरातील रक्त प्रवास थांबतो ही वस्तुस्थिती साऱ्यांना माहीत आहे. शरीरातील रक्त जो पर्यंत प्रवाही आहे, तो पर्यंत हृदयाचे ठोके पडत राहतात आणि अशा व्यक्तीची इतर हालचाल थांबली असली, ती ती व्यक्ती जिंवतच असते. शरीर मृत झाल्यानंतर रक्तप्रवास थांबतो आणि रक्त गोठते, असा नियम आहे. तथापि, मृत व्यक्तीच्या शरीरातही रक्त प्रवाह निर्माण करण्याचा शोध यशस्वी झाला आहे. दिल्लीच्या डॉक्टरांनी हा प्रयोग केला असून तो आशिया खंडात प्रथमच यशस्वी करण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे.
गीता चावला या 55 वर्षांच्या महिलेच्या संदर्भात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. गीता चावला यांनी त्यांच्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी तसे लिहून ठेवलेले होते. 6 नोव्हेंबरला चावला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या शरीरातील रक्त प्रवास थांबला. त्यामुळे अवयव काढून घेणे अशक्य झाले होते. कारण रक्त थांबल्यानंतर काही वेळातच अनेक अवयवही मृत होतात. त्यानंतर ते काढून अन्य रुग्णांमध्ये त्यांचे आरोपण करणे अशक्य असते. त्यामुळे, गीता चावला यांच्या मृत शरीरात पुन्हा रक्तप्रवाह निर्माण करण्याची आवश्यकता होती. डॉक्टरांनी ही कृती यशस्वी केल्याने त्यांच्या शरीरातील अनेक अवयव त्यांच्या मृत्यूनंतरही सचेत राहिले. त्यामुळे ते काढून घेऊन अन्य रुग्णांच्या शरीरात त्यांचे आरोपण करणे शक्य झाले. अशा प्रकारे डॉक्टरांची गीता चावला यांची अखेरची इच्छा पूर्ण केली आहे. ईसीएमओ किंवा ‘एक्स्ट्रा कॉर्पोरियन मेंब्रेन ऑक्सिजनेटर’ नामक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा प्रयोग यशस्वी करता आला आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या शरीरातील अनेक अवयव बराच काळ सचेत राहू शकले. त्यामुळे ते शरीरातून व्यवस्थितरित्या काढता येणे डॉक्टरांना शक्य झाले, अशी माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली आहे.









