ईश्वरपूरमध्ये हत्येचे थरारक प्रकार
ईश्वरपूर : बहे नाका परिसरातील रसिका मल्लेश कदम (३५ मुळ रा. उटगी ता. जत) या महिलेचा तिचा प्रियकर तुकाराम शंकर वाटेगावकर (३८ रा. बोरगाव) याने एकट्यानेच गळा आवळून खून केला. त्यानंतर अन्य दोन साथीदारांच्या मदतीने मृतदेह व ज्युपिटर गाडी ताकारी पुलावरून कृष्णानदी पात्रात फेकून देवून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
गणेश विजय इरकर (३२), राहुल अरुण माने (३३ दोघे रा. शिवाजीनगर बोरगाव) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वाटेगावकर याने रसिका हिला दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास तिच्या ज्युपिटर गाडीवरून घेवून गेला. तिचा गळा आवळून खून केला.
त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन तिच्या ज्युपिटर वरुनच ताकारी पुलावर गेला. त्यानंतर इरकर व माने यांना तिथे बोलावून घेतले. या दोघांच्या मदतीने त्याने मृतदेह व दुचाकी नदीत फेकून देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अखेर या दोघा पैकीच कुणीतरी फुटल्याने माहिती पोलीसांना मिळाली. त्याच रात्री पोलीसांनी वाटेगावकर याला ताब्यात घेवून तपासाला गती दिली. मृतदेह शुक्रवारी सकाळी साटपेवाडी बंधाऱ्या जवळ मिळून आला.








