गोल्डन पिकॉकसह तब्बल 1 कोटीची बक्षिसे
पणजी : राजधानी पणजीत होणाऱ्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपट यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकूण 15 चित्रपट असून 12 आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तर 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट म्हणजे उत्कृष्ट कलाकृती असून जागतिक स्तरावरील विविध समस्यांचे प्रतिनिधित्व त्यातून समोर येणार आहे. या महोत्सवातील विविध स्पर्धा, इतर पुरस्कार यासाठी मिळून रु. 1 कोटीची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्वांत मानाचा आणि प्रतिष्ठित असा ‘गोल्डन पिकॉक’ हा पुरस्कार असून तो रु. 40 लाखाचा आहे. त्या शिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, परीक्षक असे विविध पुरस्कारही देण्यात येणार आहेत.
या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे गेली काही वर्षे होत होता. परंतु यंदा ते स्टेडियम फिडे मानांकन या खेळासाठी व्यस्त असल्याने उद्घाटन सोहळा न करता फक्त उद्घाटनासाठी किंवा शुभारंभ म्हणून बावटा दाखवण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यावेळी कार्निव्हल, शिमगोत्सवाच्या चित्ररथांची मिरवणूक काढून गोव्याची संस्कृती दाखवण्याचा इरादा आहे. ती पणजीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. समारोपाचा सोहळा करण्याचा बेत आहे. परंतु त्याबाबतही अद्याप स्पष्टता नाही, असे दिसून आले आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा परीक्षक मंडळाचे अध्यक्ष
महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाची स्थापना करण्यात आली असून नामांकीत भारतीय चित्रपट दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. ऑस्ट्रेलियाचे दिग्दर्शक संपादक ग्रेम क्लिफर्ड, जर्मनीची अभिनेत्री कॅथरीना शुटवर, श्रीलंकेचे चित्रपट निर्माते चंद्रन रत्नम, इंग्लंडचे फोटोग्राफर रेमी अडेफारासीन यांचा मंडळात अंतर्भाव करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन भारतीय चित्रपट
अमरन (द इमॉर्टल) तामीळ, सरकीत (अ शॉर्ट ट्रिप) मल्याळम, गोंधळ हा मराठी चित्रपट असे तीन भारतीय चित्रपट त्या विभागात आहेत. ते सर्व चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असून सर्व चित्रपटांना इंग्रजी भाषांतर देण्यात आले आहे. हे भारतीय चित्रपट चांगले स्पर्धा करतील, असे सांगण्यात आले.









