नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक
सांगली: महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनायक मुरलीधर शिंदे (वय ४१, रा. पेठभाग, गवळी गल्ली, सरकारी तालीमजवळ, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संशयित दिनेश पुजारी (रा. सम्राट व्यायाम मंडळाच्या मागे, गोसावी गल्ली, खणभाग, सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी, वैभव रावसाहेब दानोळे यांच्याशी संवाद साधून संशयित दिनेश पुजारीने विश्वास संपादन केला. त्यांना सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेत कायमस्वरुपी नोकरीस लावण्याचे आमिष दाखविले.
याकरिता दानोळे यांच्याकडून त्याने ३ लाख ४० हजार रुपये उकळले. तसेच महापालिकेच्यावतीने परस्पर बनावट सही शिक्यानिशी नियुक्तीपत्र, ओळखपत्र आणि सर्वसाधारण पावती तयार करुन ती दानोळे यांना सोशल मीडियाव्दारे पाठविली. परंतु दानोळे यांनी महापालिकेत चौकशी केली असता अशी कोणतीच नियुक्ती करण्यात आल्याचे समजले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी विनायक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे








