चंदगडमध्ये दौलत कारखान्यावर सर्वपक्षीय बैठक
चंदगड : दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घामातून उभा राहिला आहे. हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, कामगारांच्याच मालकीचा राहील. चंदगड तालुक्यात कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. कितीही बाउन्सर आणले आणि कितीही बाहेरचे कामगार आणले तरी दौलत सहकारात राहीलच. यासाठी लवकरच सभासद शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन निर्णय घेतला जाईल. प्रसंगी केंद्रातून विशेष पॅकेज आणण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी हलकर्णी येथे रविवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला.
आमदार शिवाजी पाटील म्हणाले, कारखाना चालकांनी कामगारांना समजून घ्यावे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे, त्याचबरोबर कामगारांनाही न्याय मिळाला पाहिजे. ‘दौलत “मध्ये इतर राज्यातील किंवा बाहेरील कामगारांना नोकऱ्या देण्याऐवजी येथील भुमिपुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. दौलत कारखान्याच्या समस्यांबाबत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
‘दौलत “चे मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुका संघाच्यावतीने आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, शांताराम पाटील, बबनराव देसाई आदी उपस्थित होते.








