शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण : वन खात्याकडून पीक नुकसानीची पाहणी : हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी
वार्ताहर/गुंजी
शनिवारी रात्री कापोली डिगेगाळी भागातून आलेल्या एका टस्कर हत्तीने गुंजी परिसरातील तेरेरांग शिवारात शिरून भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी धाकलू चौंडी यांच्या कापणीला आलेल्या भात पिकामध्ये घुसून खाऊन, तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. भात राखणीसाठी शेतातील झोपडीमध्ये झोपलेल्या धाकलू चौंडी यांना मध्यरात्री हत्तीची चाहूल लागली. त्यामुळे त्यांनी घाबरून रात्रीच घरचा रस्ता धरला. सकाळी जाऊन पाहिले असता हत्तीने संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी येथील सेक्शन फॉरेस्टर राजू पवार यांना दिली असता त्यांनी तातडीने पीक नुकसानीची पाहणी केली आहे
सध्या या भागामध्ये सुगी हंगाम सुरू असून, बहुतांश शेतकरी भात कापणीत गुंतला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे या भागातील भात कापणी लांबणीवर पडली होती. मात्र पाऊस ओसरल्याने गेल्या चार दिवसापासून या भागात सर्वत्र भात कापणीची लगबग वेगाने सुरू आहे. अशा सुगी हंगामातच शनिवार रात्रीपासून या परिसरात हत्तींचे आगमन झाल्याने येथील शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली असून, हाता-तोंडाशी आलेली पिके आता राखायची कशी असा प्रश्न पडला आहे.वर्षभर जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण केले होते. मात्र ऐन सुगी हंगामात या परिसरात हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तरी अरण्य विभागाने त्वरित येथील हत्तीचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.









