कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील घटना
कारवार : कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्पस्थळी लोखंडी गेटचे तुकडे कोसळून केंद्रीय औद्योगिक सुरक्षितता दलाचा जवान मृत्यू पावल्याची घटना शनिवारी घडली. मृत सी.आय.एस.एफ. जवानाचे नाव शेखर भीमराव जगदाळे (वय 48, मूळचे महिमानगड, महाराष्ट्र) असे आहे. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कारवार जिल्ह्यातील कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील न्युक्लियर वेस्ट घटक स्थळी शनिवारी रात्री सी.आय.एस.एफ.चे हेड कॉन्स्टेबल पहारा देत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर बृहत लोखंडी गेटचा तुकडा तुटून पडला. तातडीने त्यांना उपचारासाठी कैगा जनरेटींग स्टेशनमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अन्यत्र नेत असताना त्यांचे निधन झाले. मल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.









