जॉर्डन हर्मन, हामझा, ईस्टरहुइझेन यांची अर्धशतके, ध्रुव जुरेल ‘मालिकावीर’ : अॅकरमन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने भारत अ संघाचा 5 गड्यांनी पराभव करत 2 सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली. भारत अ संघातील ध्रुव जुरेलला ‘मालिकावीर’ तर मार्कोस अॅकरमनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात 255 धावा जमविल्यानंतर दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव 221 धावांत आटोपल्याने भारत अ संघाने 34 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर भारत अ संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 382 धावांवर घोषित करुन दक्षिण आफ्रिका अ संघाला निर्णायक विजयासाठी 417 धावांचे आव्हान दिले. दक्षिण आफ्रिका अ संघाने बिनबाद 25 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांनी 5 बाद 417 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला. दक्षिण आफ्रिका अ संघातील दुसऱ्या डावात 5 फलंदाजांनी अर्धशतके झळकाविली.
जॉर्डन हर्मन आणि सेनोक्वेन यांनी सलामीच्या गड्यासाठी 156 धावांची दीडशतकी भागिदारी केली. प्रसिद्ध कृष्णाने स्वत:च्या गोलंदाजीवर हर्मनला टिपले. त्याने 123 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 91 धावा झळकाविल्या. हर्मनचे शतक 9 धावांनी हुकले. उपाहारावेळी दक्षिण आफ्रिका अ संघाने दुसऱ्या डावात बिनबाद 139 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतर भारत अ संघातील गोलंदाजांना ही जोडी फोडण्यास यश मिळाले. सेनोक्वेनला दुबेने पायचीत केले. त्याने 174 चेंडूत 11 चौकारांसह 77 धावा झळकाविल्या. हामझा आणि बवुमा या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 107 धावांची भागिदारी केली. हामझाने 88 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 77 धावा झोडपल्या. प्रसिद्ध कृष्णाने त्याचा त्रिफळा उडविला. बवुमाने 101 चेंडूत 7 चौकारांसह 59 धावा झळकाविल्या. मोहम्मद सिराजने कर्णधार अॅकरमनला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 24 धावा जमविल्या. व्ह्युरेन आणि ईस्टरहुइझेन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. ईस्टरहुइझेनने 54 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 52 तर व्ह्युरेनने 23 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 20 धावा जमविल्या. 98 षटकाअखेर दक्षिण आफ्रिका अ संघाने 5 बाद 417 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला. भारत अ संघातर्फे प्रसिद्ध कृष्णाने 2 तर आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – भारत अ 77.1 षटकात सर्वबाद 255 (दक्षिण आफ्रिका अ प. डाव सर्व बाद 221, भारत अ दु. डाव 7 बाद 382 डाव घोषित, दक्षिण आफ्रिका अ दु. डाव 98 षटकात 5 बाद 417 (हर्मन 91, सेनोक्वेन 77, हामझा 77, बहुमा 59, अॅकरमन 24, व्ह्युरेन नाबाद 20, ईस्टरहुइझेन नाबाद 52, अवांतर 17, कुलदीप यादव, हर्ष दुबे, मोहम्मद सिराज प्रत्येकी 1 बळी, प्रसिद्ध कृष्णा 2-49).









