सरसंघचालक मोहन भागवत यांचा सवाल : नोंदणीच्या आरोपांचे खंडन
प्रतिनिधी/ बेंगळूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुऊवात ब्रिटिश काळात झाली. आम्ही ब्रिटिशांकडे संघाची नोंदणी करायला हवी होती का, असा सवाल करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी नोंदणीच्या आरोपांचे खंडन केले. स्वातंत्र्यानंतरही नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली नाही. ही एक स्वतंत्र आणि संवैधानिक संघटना आहे आणि आम्ही प्राप्तिकर देखील भरत आहोत. कोणत्याही धर्माच्या लोकांना भारतमातेची मुले म्हणून संघामध्ये सामील होण्याची परवानगी आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
राज्य सरकारने संघाच्या कार्यक्रमांवर घातलेल्या निर्बंधांभोवती सुरू असलेल्या वादादरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी झालेली नाही. देशात त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का, असे प्रश्न काँग्रेसच्या गटातून उपस्थित केले जात आहेत. संघावर अनेक आरोपही करण्यात आले होते. रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वत: या सर्वांची उत्तरे दिली आहेत. संघाच्या शताब्दीनिमित्त होसकेरेहळ्ळी येथील कॉलेज सभागृहात त्यांनी व्याख्यान दिले.
रविवारी मोहन भागवत यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ येथून आलेल्या विविध मतदारसंघातील निमंत्रितांच्या प्रश्नांची उत्तरे देत अनेक मुद्यांवर मुक्तपणे भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये झाली. त्यावेळी भारतात असलेल्या ब्रिटिश साम्राज्याकडे आम्ही संघाची नोंदणी करायला हवी होती का? स्वातंत्र्यानंतरही नोंदणी अनिवार्य केली नाही. आमची एक स्वतंत्र आणि कायदेशीर संघटना आहे. म्हणूनच आम्ही नोंदणी केलेली नाही. हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याबाबतही चर्चा यापूर्वीही अनेकदा झाली असून न्यायालयाने ते वारंवार फेटाळून लावले आहे. आमची एक संवैधानिक संघटना असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघही प्राप्तिकर भरत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघ मुस्लिमांना सामील होण्याची परवानगी देतो का आणि अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हेतू आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, कोणत्याही धर्माचे लोक शाखेत सामील होऊ शकतात. परंतु जे शाखेत येतात त्यांनी आपला धर्म बाजूला ठेवून भारतमातेची मुले म्हणून यावे. त्यांनी हिंदू समाज स्वीकारून शाखेत सामील व्हावे. त्यांनी संघाच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.









