ऋतुपर्णा सेनगुप्ता, अरबाज खान
मुख्य भूमिकेत
सध्या मॅडॉकचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘थामा’ प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. आता याला टक्कर देण्यासाठी चालू महिन्यात ‘काल त्रिघोरी’ नावाचा सुपरनॅचरल हॉररपट प्रदर्शित होणार आहे. अरबाज खान, ऋतुपर्णा सेनगुप्ता, महेश मांजरेकर आणि आदित्य श्रीवास्तव यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर अन् ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. एका रहस्यमय वाड्याच्या अवतीभवती याची कहाणी गुंफण्यात आली आहे. या वाड्यात जाणाऱ्या लोकांसोबत विचित्र घटना घडत असतात. तेथील बाहुलीला स्पर्श न करण्याचा सल्ला देण्यात आलेला असतो, असे टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन नितिन वैद्य यांनी केले असून त्यांनीच याची कहाणी लिहिली आहे. तर शिरीष वैद्य, नितिन घटालिया आणि मानसुख तलसानिया यांनी याची निर्मिती केली आहे. चित्रपटात राजेश शर्मा, मुग्धा गोडसे आणि अन्य कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. अरबाज खान या चित्रपटातून भेटीला येणार असल्याने त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.









