जगात अनेक रंजक स्पर्धा आयोजित होतात. अमेरिकेत अशीच अनोख्या नौकेतून शर्यत आयोजित होते, येथे विशाल भोपळ्याची नौका तयार केली जाते आणि मग ती पाण्यात उतरवूत शर्यतीत भाग घेतला जातो. ओरेगन प्रांतातील टुआलाटिन शहरातील लोक विशाल भोपळ्यांना आतून पोकळ करत त्यात बसून पाण्यातील शर्यतीत भाग घेतात. वेस्ट कोस्ट जायंट पंपकिन रेगाटा नावाने हे आयोजन होते, ज्यात दरवर्षी शेकडो लोक सहभागी होत असतात.
हा अनोखा उत्सव 2004 पासून आयोजित केला जात असून आता हे ओरेगनची लोकप्रिय शरद ऋतू परंपरा ठरला आहे. कार्यक्रमात भाग घेणारे स्पर्धक स्वत:च्या भोपळ्यांना नौकेत रुपांतरित करतात आणि मग सरोवरात होणाऱ्या स्पर्धेत भाग घेतात.
चालू वर्षी या स्पर्धेत सामील झालेल्या अनेक भोपळ्यांचे वजन जवळपास 450 किलोग्रॅमपेक्षाही अधिक होते. इतक्या वजनी भोपळ्यांना सरोवरात ठेवण्यासाठी आयोजकांना फोर्कलिफ्ट मशीन्सची मदत घ्यावी लागली. यानंतर स्पर्धकांनी मोठ्या चाकूंच्या मदतीने या भोपळ्यांना आतून पोकळ करत त्याला नौकेचा आकार दिला. स्पर्धकांनी हॅलोवीनचा पेहराव केला होता. कुणी सुपरहिरो तर कुणी टीव्ही शो किंवा चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या स्वरुपात या शर्यतीत सामील झाला.









