सांगली महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम
सांगली : महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, भरारी पथकाने मागील काही दिवसांत विविध भागांमध्ये कारवाई करत १९,००० दंड वसूल केला.
वॉर्ड क्र. १९, सांगलीमध्ये रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल नागरिकावर ५,००० दंड वसूल केला. मिरज विभागामध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकावर ३,००० दंड केला. वॉर्ड क्र. ८. आलदर चौक सांगली येथे हॉटेल व्यावसायिकावर उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल ३,००० दंड करण्यात आला. मिरज विभागामध्ये वैद्यकीय व्यावसायिकाने उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकल्याने ५,००० दंड केला. वॉर्ड क्र. ८, विजयनगर येथे ई-कार्ट कंपनीने व्यावसायिक कचरा उघड्यावर टाकल्यामुळे ३,००० दंड करण्यात आला.
मुख्य स्वच्छता अधिकारी, सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, अतुल आठवले, स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे, सौरभ कांबळे, सिद्धांत ठोकळे, महेश कांबळे, सचिन वाघमोडे यांनी कारवाई केली. व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पारदर्शक कारवाई भरारी पथकाकडून सर्व दंडात्मक कारवाया फोटो व व्हिडिओ रेकॉडिंगसह करण्यात येत असून, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून नागरिकांना जागरूक केले जात आहे. नागरिकांनी रोजचा कचरा घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन केले आहे.








