वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बांगला देशच्या अंतरिम सरकारने निवडणुकीची घोषणा केली असली, तरी या देशात आता इस्लामी कट्टरवाद्यांचे वर्चस्व निर्माण झाल्याने मुक्त आणि न्यायोचित वातावरणात सार्वत्रिक निवडणूक पार पडणे अशक्य आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. जुलै महिन्यात या देशात सरकारविरोधात हिंसक उठाव करण्यात आला होता. त्यामुळे शेख हसीना सरकारचे पतन होऊन त्या देशाच्या नेत्या शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. तेव्हापासून या देशात इस्लामी कट्ठरवाद्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. कायदा हातात घेतला जात आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होऊन निवडणूक हायजॅक केली जाईल. तसेच कट्टर धार्मिक शक्तींच्या हातातील बाहुले असणारे सरकार स्थापन केले जाईल. त्यामुळे भारतालाही मोठ्या प्रमाणात धोका संभवतो. भारताने सावधपणाने या घडामोडींकडे पाहून धोरण ठरवावे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.









