माजी मंत्री जयंत पाटील व आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते लोकार्पण
सांगली : कुपवाडच्या प्रभाग क्रमांक दोनमधील मुख्य रस्त्यावरील संत रोहिदास महाराज चौक व अण्णाभाऊ साठे मार्गावर चौक सुशोभीकरणाच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात आलेल्या वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळा चौकाचे आज गुरुवारी उद्घाटन होणार आहे.
माजी नगरसेवक शेडजी मोहिते व माजी नगरसेविका सविता मोहिते यांच्या प्रयत्नाने मागासवर्गीय फंडातून १५ लाखाच्या निधीतून सदरचे चौक सुशोभीकरणाचे काम मंजूर झाले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार जयंत पाटील तसेच कुपवाड परिसरातील वारकरी सांप्रदायमधील सर्व माळकरी यांच्याहस्ते व आयुक्त सत्यम गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी सहा वाजता येथील संत रोहिदास चौकात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात आ. जयंत पाटील यांच्याहस्ते कुपवाडमधील वारकरी दिंडीचे मानकरी यांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंतांचा व विद्यार्थ्यांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध मान्यवर, पदाधिकारी, कुपवाड शहरातील सर्व सामाजिक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी कुपवाडकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी केले आहे.








