मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती : अंत्यदर्शनासाठी समर्थकांची रीघ
वार्ताहर/जमखंडी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार, माजी मंत्री व विद्यमान बागलकोटचे आमदार एच. वाय. मेटी यांचे मंगळवार 4 रोजी बेंगळूर येथील खासगी दवाखान्यात निधन झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी बागलकोट येथे आणण्यात येऊन अंत्यदर्शनाकरता नवनगर येथील क्रीडांगणावर ठेवण्यात आले होते. यानंतर बागलकोट जिह्यातील तिम्मापूर या त्यांच्या मूळगावी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री आर. बी. तिमापूर, मंत्री एम. बी. पाटील, मंत्री सतीश जारकीहोळी, माजी मंत्री सी. एम. इब्राहिम, आमदार जे. टी. पाटील, आमदार विजयानंद काशापनवर, आमदार बी. बी. चीमनकट्टी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एस. जी. नांजयनमठ, माजी आमदार आनंद न्यामगौड यांनी दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत आमदार मेटी यांची मुलगी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष बायक्का मेटी यांना दु:ख अनावर झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले.
तत्पूर्वी जिल्हा स्टेडियममधून निघालेली एच. वाय. मेटी यांची अंत्ययात्रा शहराच्या विविध भागातून काढण्यात आली. दुपारी 12 वाजता त्यांच्या मूळगावी तिम्मापूर येथे पोहोचली. फक्त कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना घरी त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची परवानगी होती. मंत्री शिवानंद पाटल, भैरती सुरेश, एम. सी. महादेवप्पा, खासदार पी.सी. गड्डीगौडा, राज्यसभा सदस्य नारायणसा भंडगे, आमदार भिमसेन चिम्मनक्कट्टी, जगदीश गुडागुंटी, सिद्धू सवदी, विधान परिषदेचे आमदार पी. एच. पुजारी आणि इतरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, एच. वाय. मेटी हे एक साधे, सज्जन होते. त्यांच्या निधनामुळे मोठे नुकसान झाले आहे आणि जिल्हा गरीब झाला आहे. याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. जन्म हा अपघाती आहे, मृत्यू निश्चित आहे आणि त्यामधील जीवन अर्थपूर्ण बनवणे महत्वाचे आहे. मेटींनी अर्थपूर्ण जीवन जगले आणि त्यांचे आदर्श इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतील, असे ते म्हणाले. अंत्यसंस्कारात उपायुक्त संगप्पा, जिल्हा पोलिस अधीक्षक सिद्धार्थ गोयल, जिल्हा दंडाधिकारी सीईओ शशिधर कुरेरा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रसन्ना देसाई, महंतेश्वर जिद्दी, अतिरिक्त उपायुक्त अशोक तेली, उपविभागीय अधिकारी संतोष जगलासर, श्वेता बिडीकर, बागलकोट आणि जमखंडी तहसीलदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.









