अगरबत्ती पॅकिंग गृहोद्योगाच्या नावाखाली गंडा
बेळगाव : अगरबत्ती पॅकिंग गृहोद्योगाच्या नावाने बेळगाव परिसरातील महिलांना लाखो रुपयांना ठकवल्याच्या आरोपावरून पंढरपूरच्या युवकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (वय 35) मूळचा राहणार जालोळी, ता. पंढरपूर, सध्या राहणार फुरसंगी पुणे याला मंगळवार दि. 4 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, मंजुनाथ बजंत्री, श्रीमती एस. एन. बसवा व एस. एम. गुडदयगोळ, श्रीधर तळवार, अजित शिप्पुरे, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
बी. एम. ग्रुप महिला गृहोद्योग समूह या नावे बेळगाव परिसरातील महिलांना अगरबत्ती पॅकिंग गृहोद्योगाच्या माध्यमातून उद्योग देण्याचे सांगून या युवकाने फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पाटील गल्ली, खासबाग येथील लक्ष्मी आनंद कांबळे यांनी 25 ऑक्टोबर रोजी शहापूर पोलीस स्थानकात बाबासाहेबविरुद्ध फिर्याद दिली आहे. प्रत्येक महिलेकडून एका आयडेंटिटी कार्डला अडीच हजार रुपये याप्रमाणे त्याने मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली आहे. अगरबत्ती पॅकिंग करून दिल्यानंतर 3 हजार रुपये पगार देण्याचे बाबासाहेबने सांगितले होते. पगार तर नाहीच महिलांना आपण गुंतवणूक केलेले पैसेही त्याने परत केले नाहीत. त्यामुळे बेळगाव परिसरातील शेकडो महिला फशी पडल्या आहेत.









