कारवार : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून चर्चेत राहिलेले विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी बुधवारी राष्ट्रगीताबद्दल केलेल्या एका विधानामुळे जोरदार चर्चेत राहीले आहेत. कागेरी यांनी जन गन मन बद्दल केलेल्या विधानामुळे जिल्ह्यात उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जात असून कागेरी यांचे ते विधान प्रसार माध्यमांवर भन्नाट व्हायरल झाले आहे. बुधवारी कारवार जिल्ह्यातील होन्नावर येथे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना हेगडे-कागेरी म्हणाले, ब्रिटिशांचे स्वागत करण्यासाठी जन गन, मन या गीताची रचना करण्यात आली होती. आमच्या देशाचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ हे गीत झाले पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे आणि हेच हेगडे यांचे विधान वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कार्यक्रमात बोलताना हेगडे पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अधिक ताकद असलेले वंदे मातरम् हेच गीत होते. आज वंदे मातरम् राष्ट्रगीत झाले पाहिजे, अशी देशवासियांची मागणी आहे, असा अभिप्राय व्यक्त करून हेगडे पुढे म्हणाले, देशाची एकता, भाषा, संस्कृती विविधता ही आमची शक्ती आहे. युवकांनी राष्ट्रहितासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. हेगडे यांनी राष्ट्रगीताचा अवमान तर केला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









