करवीर तालुक्यात विजेचा अपघात, एका भावाचा मृत्यू
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथे मंगेश्वर मंदिरमागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत तारेवर अडकलेला पतंग काढताना शॉक लागून सार्थक निलेश बळकुंजे (वय १५ धनगर गल्ली) याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ कार्तिक निलेश बळकुंजे (वय १४, धनगर गल्ली) हा गंभीर जखमी झाला. ही घटना सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली.
सार्थक व त्याचा भाऊ कार्तिक दोघे सख्खे भाऊ आहेत. दरम्यान उडत आलेला पतंग सार्थक यांच्या घराजवळ असणाऱ्या विद्युत तारेत अडकलेला होता. मृत सार्थक बळकुंजे ते पाहताच दोघे भाऊ पतंग काढण्यासाठी गच्चीवर गेले. पतंग काढण्यासाठी लोखंडी सळी तारेत घालताना मेन विद्युत तारेला सळीचा स्पर्श होताच सार्थक याला जोराचा शॉक बसला.
त्याला शेजाऱ्यांनी सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याचा दुसरा भाऊ कार्तिक याला खासगी दवाखान्यात अॅमीट केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे








