प्रतिनिधी / पुणे
देशात तसेच राज्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. बुधवारी महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी 12.6 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. गेले काही दिवस राज्यात अवकाळीचा मारा होत आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील अनेक भागात पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. बुधवारी सकाळी अनेक भागात 2 ते 3 अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट झाली. वातावरणात गारवा जाणवण्यास सुरुवात झाली. काही भागात धुक्याने देखील हजेरी लावली.
विदर्भ, मराठवाड्यात किमान तापमानात फारसा बदल नसला तरी, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात मात्र किमान तापमानात फरक पडत आहे. पुण्यात बुधवारी शिवाजीनगर भागात 18.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. दुसरीकडे वायव्य तसेच मध्य भारतात तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. बांगलादेश किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र आहे. दक्षिणेकडील काही राज्यात पावसाची शक्यता आहे.
राज्यात कोरडे हवामान
राज्यात पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तसेच पावसाचा जोर देखील ओसरणार आहे.यामुळे येत्या काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.








