केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला विश्वास
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. आज गुरुवारी प्रथम टप्प्याचे मतदान होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच विजय होईल. तसेच हा विजय झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतीत, असा विश्वास केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. विजय झाल्यानंतर नितीश कुमार यांना डच्चू दिला जाईल, हा विरोधी पक्षांचा अपप्रचार खोटा ठरणार आहे, असेही प्रतिपादन धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बुधवारी वार्तालाप करीत होते. आजवर ज्या नेत्यांनी नितीश कुमार यांना दूषणे दिली आहेत आणि त्यांची मानहानी केली आहे, त्यांना या निवडणुकीत जनतेकडून दणका बसणार आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांजवळ कोणताही मुद्दा नसल्याने ते संदर्भहीन टीका करीत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नि:संशय नितीश कुमारच
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय झाल्यानंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या संदर्भात कोणालाही प्रथम पासूनच कोणताही संशय नव्हता. विरोधी पक्षांकडून या विषयावर जनतेची दिशाभूल करण्याचे काम होत आहे. तथापि, बिहारची सूज्ञ जनता विरोधकांच्या अशा डावपेचांना फसणार नाही. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच विजयी करायचे, हा निर्णय बिहारमधील बहुसंख्य मतदारांचा आहे. त्यामुळे विरोधकांची मात्रा चालणार नाही, अशा अर्थाचे वक्तव्य प्रधान यांनी या मुलाखतीत केले.
त्यांच्या आणायचे आहे जंगलराज-2
विरोधी पक्षांची योजना बिहारमध्ये जंगलराजची दुसरी आवृत्ती आणण्याची आहे. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या काळात बिहारमध्ये गुंडशाहीचा नंगानाच चालला होता. लोक त्या आठवणी विसरलेले नाहीत. त्यामुळे जेव्हा ते लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांना पाहतात. तेव्हा त्यांना पहिल्या जंगलराजच्या त्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. विरोधकांना या निवडणुकीत कोणतीही आशा नाही, असेही प्रतिपादन प्रधान यांनी मुलाखतीत केले आहे.
संघर्ष दोन आघाड्यांमध्येच…
या विधनासभा निवडणुकीत बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यातच संघर्ष आहे. अशा संघर्षात अन्य कोणत्याही तिसऱ्या आघाडीला किंवा पक्षाला कोणतेही स्थान नाही, असे मतप्रदर्शन प्रधान यांनी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज या नव्या राजकीय पक्षासंबंधी बोलताना केले









