मेढा पोलिस ठाणे हद्दीतील हिंसाचार प्रकरण
मेढा : मेढा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील महिलेशी गैरवर्तन करत तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली असून गुन्हा ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 3.50 वाजता दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्ती हा पीडित महिलेच्या घरी गेला. त्या वेळी महिला घरात एकटी असताना त्याने घरात प्रवेश करून “डॉक्टर कोठे आहेत, ते कधी येणार आहेत?” अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यावर संशयित चिडला व “तुला जिवंत ठेवत नाही” अशी धमकी देत धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर, कानावर, बगलेत व पाठीवर वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या दिराने मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गैरवर्तन व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय पाटील करीत असून, घटनास्थळी डीवायएसपी राजश्री तेरणी यांनी भेट देऊन पाहणी केली.








