अनुदानित, सरकारी कॉलेजना विद्यार्थ्यांची कमतरता : पालकांच्या बदलत्या मानसिकतेचा परिणाम
बेंगळूर : आज-काल खासगी महाविद्यालयांचे पेव पुटले असून विविध सोयीसुविधा देत विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी ठरली आहेत. परिणामी अनुदानित व सरकारी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची कमतरता भासत आहे. यंदा पीयुसीसाठी 1.18 लाख विद्यार्थ्यांची कमतरता असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. मागील 5 वर्षांत खासगी महाविद्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अभ्यासक्रमाबरोबरच खासगी महाविद्यालयांतून नीट, सीईटी, जेईई कोर्ससाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येत असल्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा या महाविद्यालयांकडे अधिक आहे.
खासगी महाविद्यालये दुप्पट शुल्क वसूल करत असली तरी ती भरण्यास पालक समर्थता दर्शवित आहेत. खासगी महाविद्यालयांतूनच दर्जेदार शिक्षण मिळते, अशी मानसिकता विद्यार्थी, पालकर्गात आहे. याचा परिणाम सरकारी व अनुदानित महाविद्यालायांवर होत आहे. बहुतांशी महाविद्यालयांतून सीईटी, नीट, जेईई कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मागील दोन वर्षांपासून करण्यात आली आहे. काही महाविद्यालयांत स्मार्ट क्लास, डिजिटल लॅबची व्यवस्था आहे. कर्नाटक पब्लिक स्कूलद्वारे पूर्व पहिली ते बारावीपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे. स्पर्धात्मक परीक्षेद्वारे हुशार असणाऱ्यांची निवड करून त्यांची विविध विषयांचे प्राध्यापक म्हणून निवड केली आहे. तरीही सरकारी महाविद्यालये विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेण्यात यशस्वी झालेली नाहीत.









