शक्तिपीठ महामार्गाविरोधात तिसंगीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
कवठेमहांकाळ : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेली दीड वर्षापासून संघर्ष सुरू आहे. तिसंगी येथील बाधीत शेतकऱ्यांनी आता पर्यंत ५ ते ६ वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी करू दिली नाही. प्रखर विरोध करीत एका गटात पण मोजणी होऊ दिली नाही.
आज पुन्हा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शक्तिपीठ महामार्गाला एक इंच जमीन द्यायची नाही. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर महामार्ग करण्याची गरज काय. हजारो एकर बागायत शेती उद्ध्वस्त करून शासनाला कुणाचा विकास नक्की करायचा आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला.
तिसंगी गावातील सर्व बाधीत शेतकऱ्यांनी आपल्या बाधीत गटात उभा राहून प्रत्येकाने नकार दिला असून तसा पंचनामा तहसीलदार यांनी केलेला होता. त्यावेळी पुन्हा आम्ही मोजणीसाठी येणार नाही असे सांगितले होते. पण पुन्हा पुन्हा मोजणीसाठी येऊन शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. तिसंगी गावातील सर्व शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी पुन्हा इथून पुढे तिसंगी गावात शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी याल तर बाधीत शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील असा इशारा सर्व शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना दिला. मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन अधिकारी उपस्थित होते. तिसंगीतील बाधीत शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना पिटाळून दिले.
यावेळी भाई दिगंबर कांबळे, वामन कदम, शिवाजी शिंदे, जगदीश पोळ, नागेश कोरे, सौरभ कदम, रत्नाकर वठारे, सुरेश कुंभार, दादा कुंभार, शिवाजी भोसले, संग्राम शिंदे, सागर शिंदे, प्रवीण कोळी, संपत कोळी, बाळू कोळी, शिवाजी कोळी, बाजीराव जाधव, बाळू कदम, दिलीप हुबुले, उल्हास पाटील, शंकर सुतार, किशोर खराडे, अविनाश खराडे, नागेश शिंदे, मनोज जाधव, सुशीला जाधव उपस्थित होते.








