कागल शहरातील विकासकामांचे लोकार्पण
कागल : कागल शहरातील गोसावी समाज, झोपडपट्टी आणि वहुवाडी परिसराला साक्षात स्वर्ग बनवू असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागल शहरात यापूर्वी घरे नसलेल्यांना केंद्र सरकारच्या योजनेतून १,००२ घरकुले वाटप केलेली आहेत. पुन्हा नव्याने ३,२५० घरकुले देऊ, असेही ते म्हणाले. कागल शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा ना. मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू) होते. ना. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, कागल शहराचा वाढता विस्तार पाहता घरे नसलेल्यांसाठी घरकुल देणे हा माझा ध्यास होता. स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरे नसलेल्यांना घरे देण्यासारखा दुसरा मोठा आनंद नाही. स्वतःच्या हक्काच्या घरांमुळे गोरगरिबांचे राहणीमान बदलून त्यांच्यात सुसंस्कृतपणा येतो आणि एकूणच जीवनच बदलते, असेही ते म्हणाले. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काही लोक खोटी आश्वासने देतील. मताला हजार, दोन हजार रुपयेही देतील. परंतु कागल नगरपालिकेची पुन्हा सत्ता आमच्याकडे द्या, असे आवाहनही ना. मुश्रीफ यांनी केले.
जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, कागल शहरात ना. हसन मुश्रीफ यांनी मोठी विकासकामे केली आहेत. झोपडपट्टी नियमितीकरण करण्याचे काम ना. हसन मुश्रीफ यांनीच केले आहे. विरोधकांनी फक्त साखर वाटण्याचे काम केले. विरोधकांनी तुमच्या खणी काढून घेतल्या. ना. मुश्रीफ यांनी स्वखर्चातून तुम्हाला खण दिली. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत कागलची जनता राष्ट्रवादी काँग्रेस व ना. मुश्रीफ यांच्या मागे राहील. आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र ना. हसन मुश्रीफ सांगतील त्याच उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले,
कागल शहरात गोरगरिबांसाठी १००२ घरकुले साकारण्याचे काम ना. हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहरात एकही विकासाचे काम शिल्लक नाही. विरोधक दारात आले तर त्यांना हाकलून दिले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत ना. हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. स्वागत सतीश घाडगे यांनी केले.
प्रास्ताविकात माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. आभार संजय चितारी यांनी क मानले. कार्यक्रमास चंद्रकांत गवळी मुख्याधिकारी अजय पाटणकर, डॉ. अहिरे, नवल बोते, अस्लम मुजावर, सुनील माळी, सौरभ पाटील, नवाज मुश्रीफ, अमर सणगर, अक्रम न मकवाने, संग्राम लाड, शशिकांत नाईक, सागर गुरव, भरत सोनटक्के, गुलाब मकवाने यांच्यासह कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी सुद्धा येथे राहीन !
ना. मुश्रीफ म्हणाले, आत्ताच दिलेल्या घरकुलांची मी आत जाऊन पाहणी केली. इतकी सुंदर घरे आहेत की त्यामध्ये फक्त कमोडची व्यवस्था केली तर मी सुद्धा येथे येऊन राहीन.








