खडेबाजार पोलिसात तक्रार दाखल, 1 लाख 80 हजाराचा फटका
बेळगाव : राज्योत्सव मिरवणुकीत मोबाईल चोरी पाठोपाठ सोन्याचे दागिने पळविल्याच्याही घटना घडल्या आहेत. हुबळी येथील एका तरुणाच्या गळ्यातील तीन तोळ्यांची चेन अज्ञातांनी पळविली असून यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुर्गेश परशुराम रतन (वय 21) राहणार हुबळी या तरुणाने सोमवारी फिर्याद दिली आहे. शनिवार दि. 1 नोव्हेंबर रोजी दुर्गेश व त्यांचे काही मित्र बेळगावला आले होते. मित्राच्या भाच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यांना भेटण्यासाठी हे सर्व जण हुबळीहून कारमधून बेळगावला आले होते. भेटून परत जाताना राज्योत्सव मिरवणूक पाहण्यासाठी ते राणी चन्नम्मा चौक परिसरात आले. त्यावेळी ही घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी 5 ते 5.45 या वेळेत ही घटना घडली आहे. मिरवणूक पाहण्यासाठी सर्व मित्र उभे होते. त्यावेळी ढकलाढकली सुरू झाली. त्यामुळे हे सर्व जण चन्नम्मा चौक परिसरातून बाहेर पडले. तेथून बाहेर पडताना गळ्यातील तीन तोळ्यांची चेन चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिची किंमत 1 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. सोमवारी एफआयआर दाखल झाला आहे.









