सुरतमधील व्यापाऱ्याकडून हिऱ्यांचे दागिने देणार भेट
वृत्तसंस्था/ सुरत
रविवारी भारतीय महिला संघाने प्रथमच आयसीसी वनडे वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. संपूर्ण देशात फक्त महिला क्रिकेटपटूंची चर्चा सुरु असताना राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया यांनी विजेत्या टीम इंडियाला मौल्यवान बक्षिसांची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सर्व खेळाडूंना नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने भेट देण्याची घोषणा तर केलीच, पण त्यांच्या घरी सौर प्रणाली बसवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
सुरतमधील उद्योगपती आणि राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ढोलकिया विश्वचषक विजेत्या संघाला हिऱ्यांचे दागिने आणि सौर पॅनेल भेट देतील. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयापूर्वी ढोलकिया यांनी बीसीसीआयचे मानद उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना पत्र लिहून विजेत्या संघाचा सन्मान करण्याची इच्छा व्यक्त केली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की ते भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला त्यांच्या कठोर परिश्रम, प्रतिभा आणि चिकाटीचे प्रतीक म्हणून नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने देऊ इच्छितात. याशिवाय, खेळाडूंच्या घरांमध्ये छतावरील सौर पॅनेल बसवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. जेणेकरून त्यांनी देशाला अभिमानाने भरलेला प्रकाश त्यांच्या आयुष्यात चमकत राहील.









