बीसीसीआय सचिव देवजित सायकिया
वृत्तसंस्था / मुंबई
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली 2025 सालातील आयसीसी महिलांची विश्व चषक क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणाऱ्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने 51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदर घोषणा बीसीसीआयचे सचिव देवजित सायकीया यांनी केली.
महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने 2005 आणि 2017 साली झालेल्या महिलांच्या विश्व क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना दोनवेळा जेतेपदाने हुलकावणी दिली. दरम्यान 2025 च्या यजमानपद स्वीकारणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने यावेळी नवा इतिहास घडविताना विश्व चषकावर आपले नाव दिमाखात कोरले.
1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली पुरूषांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद भारताने पहिल्यांदा पटकाविले होते. या जेतेपदाने भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन मिळण्यास प्रारंभ झाला. तेव्हापासून भारतीय महिला संघाने हा चषक जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली आणि त्यांना 2025 साली चषक पहिल्यांदा पटकावण्यात यश मिळाले. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने केवळ चषकच जिंकला नाही तर लाखो भारतीय शौकिनांची मनेही जिंकली. देशामध्ये युवा पिढीतील महिला क्रिकेटपटूंना हे जेतेपद निश्चितच प्रोत्साहन देणारे ठरेल. 2025 च्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यापासून ते शेवटपर्यंत सांघिक कामगिरीवरच अधिक भर दिला होता आणि त्यांना अंतिम सामन्यात या तंत्राचे त्यांना फळ मिळाले. या स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने विद्यमान विजेत्या आणि बलाढ्या ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. वोल्वार्टच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची या स्पर्धेतील कामगिरी अंतिम सामन्यापर्यंत दर्जेदार झाली. या संघाच्या कर्णधाराने सदर स्पर्धेत सर्वाधिक धावा (571) नोंदविण्याचा विक्रम केला. तसेच तिने अंतिम सामन्यात शतक झळकविले. पण भारतीय महिला संघाने द. आफ्रिकेला चोख प्रत्युत्तर देत आपल्या दर्जाची ओळख करुन दिली.
2019 ते 2024 या कालावधीत जय शहा यांच्याकडे भारतीय क्रिकेट मंडळाच्या सचिवपदाची सुत्रे होती. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. आता जय शहा हे आयसीसीचे प्रमुख आहेत. गेल्याच महिन्यात झालेल्या एका बैठकीमध्ये जय शहा यांनी महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेत 300 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विश्वचषक विजेत्या संघाला यापूर्वी 2.88 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळत होती. आता ही रक्कम 14 दशलक्ष डॉलर्स झाली आहे. बीसीसीआयने घोषित केलेल्या 51 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेत संघातील खेळाडू, प्रशिक्षक तसेच सहाय्यक प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्यांचाही समावेश राहील.









