आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सायली सनबेचा विजय
नृसिहवाडी : गौरवाड (ता. शिरोळ) येथील सायली पूनम सतीश सनबे हिने श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे तिची अबुधाबी येथे होणाऱ्या किक बॉक्सिंग एशियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सायली ही गौरवाड येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे.
येथील प्रगतीशील शेतकरी आप्पासो सनबे यांची ती नात आहे. सायली ही माले (ता. हातकणगंले) येथील सह्याद्री विद्यानिकेतनची दहावीची विद्यार्थिनी आहे. तिने कराटे व किक बॉक्सिंग या दोन्ही प्रकारात तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
सायली हिने पुणे, सातारा, हिमाचल प्रदेश मधील खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक, गोवा येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्णपदक, नेपाळमधील स्पर्धेत कास्यपदक पटकावले आहे. सायली हिला आई, वडील, आजोबा यांच्यासह प्रशिक्षक सुप्रिया साळुंखे, प्रकाश निराळे यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापिका सारिका यादव यांचे प्रोत्साहन मिळाले.








