इचलकरंजीत लाखोंची घरफोडी !
इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील यशोलक्ष्मी नगर परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल १०.६८ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७, रा. यशोलक्ष्मी नगर) यांनी दिली आहे. ही घटना १६ ऑक्टोबरच्या रात्री ते १९ ऑक्टोबरच्या सकाळी दरम्यान घडली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी आनंद मर्दा यांनी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते.
या दरम्यान घरातील बेडरुममधील लाकडी कपाटातील ड्रॉ वर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि चांदीचे साहित्य असा एकूण १० लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यात ३९ ग्रॅम वजनाचा नेकलेस, २१ ग्रॅम वजनाचे दोन मंगळसुत्रे, अंगठी, १६ ग्रॅम वजनाचे बेसलेट, २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याची नाणी, मोत्यांची माळ आणि पूजेसाठी ठेवलेली चांदीची गाय अशा एकूण १२ तोळे वजनाचा मौल्यवान ऐवजांचा समावेश आहे.
दरम्यान, फिर्यादी यांच्या घरी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्नकार्य आहे, या पार्श्वभूमीवर घरी लग्न घाई असल्याने या गडबडीत ही चोरीची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.








