थकीत एफआरपी आणि बोनससाठी स्वाभिमानींचा संघर्ष
गडहिंग्लज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गडहिंग्लज विभागातील साखर कारखान्यांनी २०२२-२३ सालातील प्रतिटन ५० रुपये तर २०२४-२५ सालातील थकीत एफआरपी अशी एकूण २७ कोटी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सोमवारी दुपारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा प्रांत कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर आंदोलक आणि पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दीक वादावादी झाली. आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे महसूलचे अधिकारी, कारखान्याचे अधिकारी यांना आंदोलनस्थळी उपस्थित रहाणे भाग पडले. अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी तासभर उपस्थिती यामुळे सोमवारचा स्वाभिमानीचा मोर्चा चांगलाच चर्चेत ठरला.
गडहिंग्लज साखर कारखाना, ओलम शुगर, दौलत अथर्व, इकोकेन, आजरा कारखाना यांच्याकडून सुमारे २७कोटी इतकी रक्कम या भागातील ऊस उत्पादकांना येणे आहे. या रक्कमेबरोबरच सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेश सचिव राजेंद्र गुडयान्नावर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी नेहरू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली.
मोर्चा शहरात फिरुन प्रांत कार्यालयावर आल्यानंतर येथे पोलिसांनी हा मोर्चाला रोखला . त्यानंतर प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या दालनात संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला गडहिंग्लजचे तहसिलदार ऋषिकेत शेळके, चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण, प्रादेशिक साखर संचालक कार्यालयाचे प्रतिनिधी मयुर साळुंखे, जिल्हा पणन अधिकारी जी. एन. मगरे यांच्यासह या भागातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सन २०२२-२३ सालातील कराराप्रमाणे उसाची प्रतिटन ५० रुपये इतकी रक्कम मिळावी, अशी मागणी प्रा. दीपक पाटील, राजगोंड पाटील, जगन्नाथ हुलजी यांनी केली. यावेळी उपस्थित कारखाना प्रतिनिधींनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने नाराजी व्यक्त केली.यावेळी २०२४-२५ सालातील एफआरपीची थकीत रक्कम इकोकेन (५ कोटी ४० लाख), ओलम शुगर (५ कोटी २८ लाख), आजरा (१ कोटी ४५ लाख) आणि गडहिंग्लज कारखाना (३ कोटी ७० लाख) ही रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी केली.
एफआरपीची रक्कम मिळत नसल्यास संबंधीत कारखान्यावर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी दीपक पाटील यांनी केली. त्यानंतर सोयाबीनचे खरेदी केंद्र सरकारच्या आदेशानंतर सुरु करणार असल्याचे जिल्हा पणन अधिकारी मगरे यांनी सांगितले. थकीत रक्कमेवर चर्चा समाधानकारक झाली नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर आंदोलकांना माहिती द्यावी, असे सांगत बैठक सोडली.त्याचवेळी प्रांत कार्यालयासमोर प्रदेश सचिव राजेंद्र गुडयान्नावर यांनी बैठकीचा आढावा घेत आक्रमक भूमिका घेतली. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी . गुडयान्नावर यांना मारुती व्हॅ नवर चढून भाषण करण्यास अटकाव केला.
यावेळी दोघांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात झाली. सर्व अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावण्यात आले. यावेळी गड्यान्नावर यांनी जोरदार भाषण करत उपस्थित कारखान्याच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. एफआरपी टाळणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर फौजदारीचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रादेशिक साखर संचालक कार्यालयाचे प्रतिनिधी साळुंखे यांच्याकडे केली. या भागातील शेतकरी भिक मागत नाहीत, तर हक्काचे २७ कोटीची मागणी करत असल्याचे सांगितले.
गड्यान्नावर यांनी गडहिंग्लजला सोयाबिनचे खरेदी केंद्र तातडीने सुरु करावे अन्यथा ३ नोव्हेंबरला गडहिंग्लजला तर साखर कारखान्यांनी थकीत रक्कम तातडीने नाही दिल्यास ४ नोव्हेंबरला पाटणे फाटा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृवाखाली बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला. या आंदोलनात धोंडीबा कुंभार, राजेंद्र पाटील, बसवराज मुत्नाळे, दशरथ दळवी यांचीही भाषणे झाली. मोर्चाला मल्लाप्पा आमाते, बसवराज बंदी, सखाराम केसरकर, संजय देसाई, आप्पासो देसाई, शशिकांत रेडेकर, सतिश सबनीस, विश्वनाथ पाटील यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.








