सर्वोच्च न्यायालयात अर्जाची आज छाननी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा खटला लवकर पटलावर यावा व त्यावर सुनावणी व्हावी, असा अर्ज महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. या अर्जाची छाननी सोमवार दि. 27 रोजी होणार असून यानंतर सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेव्हापासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. परंतु मागील काही वर्षांत सुनावणीच झालेली नाही. त्यामुळे हा प्रलंबित खटला पटलावर यावा यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सोमवारी छाननी केली जाणार आहे. सीमाप्रश्नाच्या खटल्याचा 801 वा क्रमांक असल्याने या अर्जाची छाननी करून त्यानंतर सुनावणीची पुढील तारीख मिळण्याची शक्यता आहे. तज्ञ समितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा करून महाराष्ट्राच्या वकिलांना सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नेमके काय होणार? याकडे सीमावासियांचे लक्ष लागले आहे.









