वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 च्या प्रो-कब•ाr लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या प्ले ऑफ सामन्यात पाटणा पायरेट्सने यू मुम्बाचा 40-31 अशा गुणांनी पराभव केला. आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या पाटणा पायरेट्सचा हा सलग सहा सामन्यातील सहावा विजय आहे. आता या स्पर्धेत पहिल्या एलिमिनेटर सामन्यात पाटणा पायरेट्सची गाठ जयपूर पिंक पँथर्सशी होणार आहे.
पाटणा पायरेट्स आणि यू मुम्बा यांच्यातील झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सच्या आयानने 14 गुण नोंदविले तर नवदीपने 7 तसेच अंकितने 4 गुण नोंदविले. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही संघांनी सुरुवातीला झटपट गुण मिळविले. मिलान दाहियाने आपल्या चढाईवर 2 गुण वसूल केले. त्यानंतर अजित चौहानने सुपर रेडवर आयान, नवदीप आणि बालाजी यांना बाद केले. पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत यू मुम्बाने पाटणा पायरेट्सवर 10-9 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत पाटणा पायरेट्सचा कर्णधार अंकितने आपल्या चढाईवर 2 गुण मिळवून दिले. सुनीलकुमार आणि परवेश यांच्या चुकीमुळे पाटणा पायरेट्सने यू मुम्बावरील आघाडी 4 गुणांनी वाढविली. त्यानंतर पाटणा पायरेट्सने यू मुम्बाचे सर्व गडी बाद केल्याने त्याना 7 गुणांची बढत मिळाली. मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने यू मुम्बावर 20-15 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात आयानच्या शानदार खेळीमुळे पाटणा पायरेट्सने आपली आघाडी अधिक वाढविली. अखेर पाटणा पायरेट्सने यू मुम्बाचा 40-31 अशा 9 गुणांच्या फरकाने पराभव केला.









