24 तासात सरासरी नोंद 3 इंच : सर्वाधिक काणकोणला : येलो अलर्ट जारी
विशेष प्रतिनिधी / पणजी
पावसाने अक्षरश: कहर केला असून संपूर्ण गोव्याला झोडपून काढले आणि अपेक्षेप्रमाणे मेघगर्जनासह जणूकाही मौसमी पाऊस असल्यासारखा तो कोसळत राहिला. गेल्या 24 तासात सरासरी पावसाची नोंद 3 इंच झालेली आहे. काणकोणला चक्क साडेपाच इंच पाऊस पडला. शनिवारी दिवसभर संपूर्ण गोवाभर पावसाची रिपरिप चालूच होती. आगामी 48 तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून येलो अलर्ट जारी केला आहे
मान्सूनोत्तर पावसाने गोव्यात धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण गोव्याला गेल्या 24 तासात झोडपून काढले असून रात्रभर पडलेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा हा परिणाम असून गोव्यापासून 370 किलोमीटर दूर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आहे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होते की काय यावर हवामान खाते लक्ष ठेवून आहे. गोव्याच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्रात पावसाचे जोरदार वातावरण असून पावसाचे हे ढग गोव्याच्या दिशेने सरकत आहे. शनिवारी सकाळपासून गोव्याच्या आसपास सर्वत्र पावसाळी ढगाने व्यापले होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर पडत होता. कर्नाटकाप्रमाणेच गोव्यालाही पावसाने झोडून काढले. सर्वाधिक पावणे सहा इंच पाऊस हा काणकोणमध्ये झालेला आहे. काणकोण परिसरातील धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. सध्याच्या पावसामुळे गोव्यातील सर्व धरणे पुन्हा एकदा भरून गेली आहेत. अंजुणे धरण परिसरातही जोरदार पाऊस झाल्यामुळे या धरणातील गेटही खुली करावी लागणार आहे. गेल्या पाच दिवसात गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. दिनांक 28 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करून येलो अलर्ट जारी केला आहे.
सध्याचा पाऊस हा अरबी समुद्रातील ढगांशी जोडलेला आहे. त्यामुळे किनारी भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. कर्नाटकातून येणाऱ्या ढगांचेप्रमाण सांगे, काणकोण, केपे परिसरात जास्त असल्याने या भागात जोरदार पाऊस पडत आहे. सध्याचा पडणारा पाऊस हा जणू काही जुलैमध्ये कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे तो कोसळत आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण दिवसभरात पावसाची रिपरिप चालू आहे. पावसाचे हे वातावरण पुढील चार दिवस राहणार असून दरम्यान चेन्नईच्या परिसरात आणखी एक मोनथा चक्रीवादळ येत असून ते पुढे उत्तर पश्चिमच्या दिशेने सरकत आहे. त्याचाही परिणाम गोव्यापर्यंत अपेक्षित असून गोव्याला दोन्ही बाजूने जोरदार पाऊस पडणार आहे. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण जसे असते तशाच पद्धतीचे पावसाचे प्रमाण सध्या चालू आहे. या पावसाने गोव्यातील कापणीस आलेली शेती आडवी पडली आणि तयार झालेले भात पावसात भिजल्याने त्याला कोंब फुटले आहेत म्हणजे ते आता वापरण्यास अयोग्य ठरले आहे. शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे.
आंबा, काजू, फणस उत्पादनावर परिणाम
सध्या पडणारा पाऊस हा मौसमोत्तर पाऊस असून याला अन सीजनल पाऊस म्हटले जाते. हा पाऊस आंब्याला मोहर येण्यासाठी फार अडथळे निर्माण करणार आहे त्याचबरोबर काजू पिकावर यंदाही परिणाम होईल,असा अंदाज आहे तेव्हा ना थोडा उकाडा आणि लागलीच हिवाळा असा मौसम सुरू होत असतो परंतु एकदा संततधार पाऊस चालू असल्यामुळे त्याचा मौसमी पिकावर परिणाम होईल, असा अंदाज कृषितज्ञ व्यक्त करीत आहेत.
काणकोणला झोडपले
गेल्या 24 तासात सर्वाधिक पावणे सहा इंच पावसाची नोंद काणकोण येथे झाली. मुरगाव येथे चार इंच, पणजी येथे तीन पूर्णांक पाच इंच, दाबोळी येथे सव्वातीन इंच, म्हापसा, धारबांदोडा येथे प्रत्येकी तीन इंच, केपे, फोंडा येथे प्रत्येकी पावणेतीन इंच, जुने गोवे व सांगे येथे प्रत्येकी अडीच इंच, सांखळी येथे दोन इंच व पेडणे येथे पावणेदोन इंच पावसाची विक्रमी नोंद झाली.
आगामी 24 तासात गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे वाहेल व वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर एवढा राहील. काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे व मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊ नका, असा सल्ला दिला आहे.









