जुने लोहमार्ग काढून नवीन बसविण्याचे काम सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकातील जुने लोहमार्ग काढून नवीन बसविण्याचे काम शनिवारी हाती घेण्यात आले होते. मुख्य ट्रॅकच्या बाजूने असलेल्या लोहमार्गावर हे काम सुरू होते. मागील अनेक दिवसांपासून हा ट्रॅक असल्यामुळे तो दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार जुना ट्रॅक बदलून त्या ठिकाणी नवा ट्रॅक घालण्यात आला. बेळगाव रेल्वेस्थानक परिसरात अनेक विकासकामे केली जात आहेत. रेल्वेस्थानकामध्ये अमृत भारत योजनेंतर्गत कामे केली जात आहेत. उर्वरित भागात नैर्त्रुत्य रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाकडून कामे सुरू आहेत. टिळकवाडी येथील रेल्वेगेटपासून रेल्वेस्थानकापर्यंत
क्रॉसिंगला लागून एक ट्रॅक घालण्यात आला होता. ज्यावेळी रेल्वेस्थानकावर रेल्वेंचे ट्रॅफिक जास्त असेल त्यावेळी या रेल्वेमार्गाचा वापर केला जात असतो. लोखंडी रुळ असल्यामुळे ते काही दिवसांनी खराब होत असतात. हे खराब लोहमार्ग बदलण्याचे काम सध्या नैर्त्रुत्य रेल्वेकडून केले जात आहे. शनिवारी सकाळपासून गुड्सशेड रोड परिसरात नवीन ट्रॅक घालण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही काळ ही वाहतूक इतर ट्रॅकद्वारे वळविण्यात आली होती.









