कारवार : खराब वातावरणामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील तालुक्यांमधील मासेमारी आणि पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो पट्टा हळूवारपणे ईशान्य दिशेला सरकत असल्याने भारतीय हवामान खात्याने कारवार जिल्ह्यात ऑरेंज अलर्टची घोषणा केली आहे. अरबी समुद्रासह किनारपट्टीवर प्रतितासी 45 ते 55 कि.मी. वेगाने वारे वाहत आहेत. शिवाय किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील खराब वातावरणामुळे जिल्हा प्रशासनाने मच्छीमारी बांधवांना समुद्रात न उतरण्याचा इशारा दिला आहे.
यामुळे मासेमारीच्या ऐन हंगामात किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यातील मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आता कोठे पर्यटन व्यवसायाला सुरूवात झाली होती. दिवाळीच्या सुट्टीमुळे जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची पावले वळू लागली होती. तथापि, गेल्या काही दिवसांपासून खराब वातावरणाने जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनावर बंदी घातली आहे. दरम्यान शुक्रवारी जोरदार वारा आणि पावसामुळे येथून जवळच्या बिणगा येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर मोठे आंब्यांचे झाड कोसळले. झाडाखाली सात मोटारसायकली सापडून मोठी हानी झाली. शिवाय एका गायीचा मृत्यू झाला आहे.









