वृत्तसंस्था / सिडनी
भारताबरोबर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन अष्टपैलु ग्लेन मॅक्सवेलचे दुखापतीनंतर पुनरागमनाची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या मालिकेसाठी नवोदित वेगवान गोलंदाज माहीली बर्डमन या नव्या चेहऱ्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवड केली आहे. ही टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून कॅनबेरा येथे सुरू होईल.
सध्या उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात असून यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील सलग पहिले दोन सामने जिंकून भारताचे आव्हान संपुष्टात आणले आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी होत आहे. हा सामना भारताच्या दृष्टिने औपचारिक म्हणावा लागेल. पण भारतीय संघ या मालिकेत व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
37 वर्षीय मॅक्सवेलच्या मनगटाचे हाड मोडले होते. त्यामुळे या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी त्याला खूपच कालावधी लागला. दरम्यान टी-20 मालिकेतील शेवटच्या तीन सामन्याकरिता निवडीसाठी आपण उपलब्ध असल्याचे मॅक्सवेलने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कळविले आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जोश हॅजलवूड आणि अष्टपैलु सिन अॅबॉट हे अनुक्रमे पहिल्या दोन आणि तीन सामन्यांसाठी उपब्लध राहतील. न्यूझीलंडमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळताना मॅक्सवेलला दुखापत झाली होती. या आगामी मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 20 वर्षीय नवोदित वेगवान गोलंदाज माहिली बर्डमनला निवडले आहे. 2024 साली झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये बर्डमनचा समावेश होता.
वनडे मालिकेतील शनिवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन निवड समितीने नव्या खेळाडूंना संधी देण्याचे ठरविले आहे. या सामन्यासाठी अष्टपैलु जॅक एडवर्ड्स आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मॅट कुहेनमन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे लाबुसेनलाही संधी मिळणार आहे. या शेवटच्या सामन्यात कॅमेरुन ग्रीनला वगळण्यात आले आहे. यष्टीरक्षक जोस इंग्लीसलाही या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन संघ: मिचेल मार्श (कर्णधार), बार्टलेट, कॅरे, कोनोली, एडवर्ड्स, इलीस, हॅजलवूड, हेड, इंग्लीस, कुहेनमन, ओवेन, फिलिपी, रेनशॉ, शॉर्ट, स्टार्क आणि झम्पा
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ: मिचेल मार्श (कर्णधार), सीन अॅबॉट (पहिल्या तीन सामन्यांसाठी), बार्टलेट, बर्डमन (शेवटच्या तीन सामन्यांसाठी), टीम डेव्हीड, ड्वेरहुईस (शेवटच्या दोन सामन्यांसाठी), नाथन इलीस, हॅजलवूड (पहिल्या दोन सामन्यांसाठी), हेड, इंग्लीस, कुहनेमन, ओवेन, फिलिप, शॉर्ट, स्टोईनीस आणि झाम्पा.









