बांबोळी येथील अपघातात झाले होते जखमी
पणजी : बांबोळी येथे झालेल्या स्वयं अपघातातील दोन्ही अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही युवक भारतीय नौदलाचे कॅडेट गोव्यातील आयएनएस हंसशी निगडीत होते. दोन दिवसापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. आगशी पोलिसांनी अपघाताची नोंद करून जखमी झालेल्या युवकांना गोमेकॉत दाखल केले होते, मात्र काल गुरुवारी त्यांचे निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या युवकांची नावे विष्णु जयप्रकाश (21 वर्षे, कन्नुर, केरळ), हरिगोविंद पी. (22 वर्षे, कोलम, केरळ) अशी आहेत. दोन्ही युवक बुलेटवरून पणजीच्या दिशेने येत होते.
बांबोळी येथे सैनिक आरामगृहाच्या विरुद्ध बाजूला पोचल्यानंतर रस्त्याच्या दुभाजकाला त्यांच्या बुलेटची जोरदार धडक बसली होती. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.30 वाजता हा अपघात झाला होता. अपघातानंतर दोघाही युवकांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. मात्र, नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नौदल अधिकारी गोमेकॉत पोचले. कुटुंबीयांनीही गोव्यात धाव घेतली. नौदलाच्या कोची येथील मुख्यालयातून या दोघाही युवकांना विशेष ‘ड्युटी’साठी गोव्यात पाठवले होते. वास्को येथे आयएनएस हंस तळावर शेवटचा निरोपाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली.








