फ्रूट मार्केट परिसरातील प्रकार : कचरापुंडीची मागणी
बेळगाव : गांधीनगर येथील होलसेल फ्रूट मार्केटमध्ये खराब झालेली फळे टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बाजूला एका खुल्या जागेमध्ये ती टाकली जात आहेत. परंतु यामुळे दुर्गंधी पसरण्यासोबत डासांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या परिसरात मोठ्या कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. किल्ला तलावाच्या बाजूलाच बेळगावचे होलसेल फ्रूट मार्केट आहे. जिल्ह्याचे मोठे मार्केट असल्यामुळे दररोज शेकडो टन फळांची आवक सुरू असते. प्रवासादरम्यान काही फळे सडली जातात. अगदी देशाच्या शेवटच्या टोकापासून सफरचंदासारखी फळे वाहनांनी बेळगावपर्यंत आणली जातात. त्यामुळे खराब झालेली फळे राष्ट्रीय महामार्गाला लागून एका खुल्या जागेत टाकली जात आहेत.
सडलेली फळे उचलणे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखीचे ठरू लागले आहे. तसेच याचा परिणाम फ्रूट मार्केटच्या व्यापारावरही होत आहे. आजूबाजूला खाद्यपदार्थ, तसेच इतर दुकाने आहेत. त्यामुळे फ्रूट मार्केट येथे महानगरपालिकेने कचराकुंडी उपलब्ध करून दिल्यास याठिकाणी सडलेली फळे टाकणे सोयीचे होणार आहे. बेळगावसह आसपासच्या जिल्ह्यामधील, तसेच गोवा व कोकणातील फळ खरेदीदार मार्केटमध्ये येतात. परंतु अशा गलिच्छ जागेजवळूनच त्यांना मार्केटमध्ये प्रवेश करावा लागत आहे. मार्केटमुळे महानगरपालिकेला चांगल्याप्रकारे महसूलदेखील मिळत असल्याने कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत विचार करून एखादी मोठी कुंडी उपलब्ध करून दिल्यास कचरा उचल करणेही सोयीचे होणार आहे.









