प्रतिनिधी/ इंदूर
उपांत्य फेरीत स्थान निश्चित झाल्यानंतर गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंड आज बुधवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक सामन्यात आमनेसामने येतील तेव्हा गुणतालिकेच्या अव्वल दोन स्थानांवर विसावलेले हे संघ विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत, त्यांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत आणि एक सामना पावसामुळे वाया गेला आहे, परंतु इंग्लंडच्या 1.490 च्या तुलनेत 1.818 च्या उच्च नेट रन रेटमुळे ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत आरामात अव्वल स्थानावर आहे. दोन्ही संघांचा विजय केवळ त्यांना गुणतालिकेत वरचे स्थान देऊन जाणार ााही, तर अगदी जवळ असलेल्या बाद फेरीत प्रवेश करताना एक महत्त्वाची मानसिक धार देखील प्रदान करेल.
अॅलिसा हिलीचा ऑस्ट्रेलिया गट टप्प्यात जरी निर्दोष राहिलेला नसला, तरी तो बलवान राहिलेला आहे. त्यांनी मोहिमेची सुऊवात करताना दोनदा त्यांची फलंदाजी कोसळली. परंतु अॅश्ले गार्डनर आणि बेथ मुनी मदतीला धावून आल्याने त्यांना न्यूझीलंड आणि पाकिस्तानला नमविता आले. तेव्हापासून सलग दोन शतके झळकावलेली कर्णधार हिली आणि विश्वासार्ह फोबी लिचफिल्डच्या नेतृत्वाखालील त्यांच्या वरच्या फळीने लय मिळवली आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा पराभूत करण्यास कठीण संघ बनला आहे.
इंग्लंडला वेगवान गोलंदाजांविऊद्ध संघर्ष करावा लागला आहे आणि नवीन चेंडू हाताळण्याच्या बाबतीत तज्ञ गोलंदाज असलेल्या मेगन शटसारख्या खेळाडू याचा फायदा घेण्यास उत्सुक असतील. मानसिकदृष्ट्या पाहिल्यास ऑस्ट्रेलियाचे पारडे भारी आहे. कारण त्यांनी या वर्षाच्या सुऊवातीला घरच्या मैदानावर सर्व प्रकारांत त्यांचा पराभव केला होता. असे असले, तरी, याच ठिकाणी नुकताच भारतावर रोमांचक विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचा उत्साह उंचावला असेल. इंग्लंडच्या गोलंदाजांनी दबावाखाली आपली ताकद टिकवून ठेवली. लिन्सी स्मिथने शेवटच्या षटकात 13 धावांचा बचाव करण्यापूर्वी स्मृती मानधनाचा महत्त्वाचा बळी घेतला.
शिस्तबद्ध मारा हे इंग्लंडचे वैशिष्ट्या आहे. जगातील अव्वल गोलंदाज असलेली डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोन आणि ऑफस्पिनर चार्ली डीनने नियंत्रण मिळवून दिल्याने इंग्लंडला सातत्याने कठीण परिस्थितीतून बाहेर काढणे त्यांच्या गोलंदाजी विभागाला शक्य झालेले आहे. तथापि, इंग्लंडच्या फलंदाजी विभागाबद्दल चिंता कायम आहे. धावा काढण्याचा मोठा भार अनुभवी खेळाडू हीदर नाईट आणि नॅट सायव्हर-ब्रंटवर पडला आहे, ज्यांनी अनेक डावांची उभारणी केलेली आहे. एमी जोन्सने भारताविऊद्ध अर्धशतक झळकावून धैर्य दाखवले, परंतु सहकारी सलामीवीर टॅमी ब्युमोंटसह सातत्याने चांगली सुऊवात करण्याच्या बबातीत तिला संघर्ष करावा लागला आहे.
सोफिया डंकले, एम्मा लॅम्ब आणि अॅलिस कॅप्सी यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीने मात्र चांगली कामगिरी केलेली नसून त्यांनी सरासरी 10 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. तरीही अनुभवी डॅनी वायट-हॉज बाहेर बसलेली असून मुख्य प्रशिक्षक चार्लोट एडवर्ड्स त्याच संघरचनेस चिकटून राहण्यास उत्सुक दिसत आहेत.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
एलिसा हिली दुखापतीमुळे लढतीस मुकणार, मॅकग्राकडे नेतृत्व
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली आजच्या इंग्लंडविऊद्धच्या सामन्याला मुकणार, कारण तिच्या पोटरीला दुखापत झालेली असून सात वेळच्या विजेत्या संघाचे त्यामुळे ताहलिया मॅकग्रा नेतृत्व करणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराला शनिवारी सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. ‘तिच्या पायाच्या पोटरीत थोडासा ताण जाणवत असून ते दुर्दैवी आहे, असे मुख्य प्रशिक्षक शेली नित्स्के यांनी सांगितले आहे.









