महामार्गावरील वाहनांची गती मंदावली : हिवाळी अधिवेशनाची तयारी
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर हलगा येथील सुवर्णविधानसौध परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी गवत काढून त्याला आग लावण्यात आल्याने प्रचंड धूर झाला होता. या धुरामुळे राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणारी वाहनेदेखील दिसत नसल्याने काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. सुवर्णविधानसौध बेळगावमध्ये निर्माण केल्यापासून या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होण्याची शक्यता आहे. अधिवेशनासाठी केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. सुवर्णविधानसौध परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात गवत उगवले होते. गवत आता सुकत असल्याने ते कापून आग लावण्यात आली.
गवत जाळल्याने पसरला धूर…
सुवर्णविधानसौधच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गवत असल्यामुळे आग भडकली. त्यामुळे बराचकाळ धुराचे लोळ उठत होते. या धुरामुळे सुवर्णविधानसौधदेखील दिसत नव्हती. तसेच राष्ट्रीय महामार्गावरदेखील धूर पसरला होता. यामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची धिम्यागतीने ये-जा सुरू होती.









