तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार : गावागावात केली जाणार जागृती
बेळगाव : भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. या विरोधात 1956 पासून केंद्र सरकारचा निषेध करत बेळगावमधील मराठी भाषिक काळादिन पाळतात. हा काळादिन कोणतीही भाषा अथवा राज्याच्या विरोधात नसून केंद्र सरकार विरोधात आहे. 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये मूक सायकल फेरी काढून आपला निषेध व्यक्त केला जाणार असून यासाठी तालुका म. ए. समिती गावागावात जागृती करणार असल्याचा निर्धार करण्यात आला. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी मराठा मंदिर येथील सभागृहात पार पडली. व्यासपीठावर तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सचिव अॅड. एम. जी. पाटील, लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काळ्या दिनाच्या फेरीमध्ये ग्रामीण भागाला सहभागी करून घेण्यासाठी दिवाळीनंतर जागृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. फितुरांमुळे राष्ट्रीय पक्षातील नेत्यांची ताकद वाढली महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कार्यरत असलेली संघटना आहे. परंतु या संघटनेवर आता राष्ट्रीय पक्षातील नेते, खासदार, आमदार तोंडसुख घेताना दिसतात. याला जबाबदार आपल्यातील फितूर आहेत. संघटनेत काम करून मोठी पदे भोगून फितुरी करत राष्ट्रीय पक्षांना मदत केल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे असल्या फितुरांना पुढील काळात मराठी भाषिक जागा दाखवून देतील, असा प्रहार मनोहर किणेकर यांनी केला. यावेळी अनिल पाटील, पियुष हावळ, शिवाजी खांडेकर, मनोहर संताजी, दीपक पावशे, महादेव कंग्राळकर, मनोहर हुंदरे, आर. के. पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मते मांडली.
समिती विरोधातील वक्तव्यांचा घेतला समाचार
मागील काही दिवसात कन्नड संघटनेचा एक म्होरक्या बेळगावमध्ये येऊन म. ए. समिती तसेच मराठी भाषिकांच्या विरोधात बरळला. तसेच खासदार जगदीश शेट्टर व मंत्री एच. के. पाटील यांनी देखील म. ए. समितीवर आगपाखड केली होती. या सर्व वक्तव्यांचा म. ए. समितीने समाचार घेतला. महाराष्ट्रात जावून काळादिन पाळावा, असा अनाहूत सल्ला देण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रात जाण्यासाठीच 70 वर्षांपासून लढा दिला जात असल्याचे सांगण्यात आले.









