धनत्रयोदशी निमित्त सातारकरांची बाजारात खरेदीला झपाट्याने गर्दी
सातारा : दीपावलीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची धामधमु सुरु होते. खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त महत्वाचा मानला जात असल्याने येथील बाजारपेठेत लोकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. साताऱ्याच्या सराफ पेढीतही कोट्यावधींची उलाढाल झाली.
रोज वाढत असलेल्या सोन्याच्या दराचा सराफा बाजारपेठेवर कसलाही परिणाम झाल्याचे दिसले नाही. सायंकाळी बाजारपेठेत पुरोहितांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्याची लगबग सुरु होती. दरम्यान, चाकरमानी दिवाळी सणासाठी गावी येत असल्यामुळे संपूर्ण महामार्गावर लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. सातारा शहरात दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मोठा उत्साह पहायला मिळत आहे.
वसुबारसेच्या दिवशी पंचपाळी हौद येथे दरवर्षीप्रमाणे गाई, वारसाची पूजा करण्यासाठी सुविधा करण्यात आली होती. त्या ठिकाणी भाजपाचे आमदार मनोज घोरपडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी भेट दिली. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासून व्यापारी वर्गात धन्वंतरी पूजनाची लगबग सुरु होती. सकाळपासूनच सातारा शहरातील बाजारपेठेत खरेदीकरता गर्दी झाली होती.
धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोने, चांदी, पितळेची भांडी, झाडू खरेदीसाठी राजपथ ते पोवई नाका दरम्यान दुकानात सातारकरांची गर्दी दिसत होती. सोने खरेदीसाठीही चांगला मुहूर्त समजला जात असल्याने साताऱ्याच्या सराफ बाजारातही गर्दी दिसत होती. पेढीवर व्यापाऱ्यांना मान वर काढायला वेळ मिळत नव्हता. सुवर्णपढ्यांवर कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी व्यापारी पेठांमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत धन्वंतरीचे पूजन करण्यात आले.








