सांगलीतील सराईत चोरटा जेरबंद, शाहूपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : जाधववाडी-कदमवाडी परिसरात झालेल्या दोन घरफोड्या उघडकीस आणण्यात शाहूपुरी पोलिसांना – यश आले. या प्रकरणी सराईत चोरटा सुनिल नामदेव रुपनर (वय ३४, रा. सावळी रोड, कुपवाड, मिरज) याला अटक केली. त्याच्याकडून तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख २५ हजार रुपये, एक दुचाकी असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान डॉ. गौतम गिरी (वय २५, रा. नक्षत्र रेसिडेन्सी, कदमवाडी, मूळ रा. पश्चिम बंगाल) यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून चोरी झाली होती. चोरट्यांनी कपाटातील रोख ८५ हजार रुपये चोरून नेले. तर बुधवारी (ता. १५) सकाळी अकराच्या सुमारास अनुष्का विलास प्रधान (वय ३७रा. इंद्रजित कॉलनी जाधववाडी) कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास त्या आल्या असता घराचा कडीकोयंडा तुटल्याचे त्यांना दिसले. चोरट्याने घरात प्रवेश करत तिजोरीतील ३ तोळे ३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे दिसून आले.
या दोन्ही घटनांचा तपास शाहूपुरी पोलीस करत होते. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करता सराईत चोरटा सुनिल रुपनरने या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले. तो दुचाकीवरून येऊन एकटाच चोरी करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याला सांगली येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मिलींद बांगर, बाबासाहेब ढाकणे, महेश पाटील, सुशील गायकवाड, सनिराज पाटील, अमोल पाटील, राहूल पाटील, कृष्णात पाटील, भैरू माने, रवी आंबेकर यांनी तपास केला.
दिवसा घरफोडी करण्यात हातखंडा
सुनिल रुपनर सराईत चोरटा आहे. त्याच्यावर कोल्हापूर, मिरज आणि सांगली येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दिवसा एकटा घरफोडी करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे.








